Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
पोंभूर्णा तालुक्याचा गौरव वाढविण्यासाठी जनतेसोबत ठामपणे उभा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महिला सक्षमीकरण, कला-संस्कृती व नागरिक सुविधांना चालना.
पाणीपुरवठा योजनेसाठी ४१ कोटींची घोषणा, सहा महिन्यात बसस्टॉप पूर्णत्वास व रस्त्यांसाठी निधी देणार.

चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी फिश मार्केट व खुले नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, महिला सक्षमीकरण, कला-संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास दिला. नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून ते शहराची आणि तालुक्याची सांस्कृतिक ओळख जपण्यापर्यंत सर्वच आघाड्यांवर पोंभूर्णाची विकास प्रक्रिया अविरत सुरू राहील. या वाटचालीत पोंभूर्णा शहराचा आणि तालुक्याचा गौरव वाढविण्यासाठी आपण सदैव जनतेसोबत ठामपणे उभे राहू, असा विश्वासही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात आलेल्या फिश मार्केट आणि खुल्या नाट्यगृहाचे लोकार्पण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, महिला प्रदेश सरचिटणीस अल्काताई आत्राम, सार्व. बांधकाम विभागाचे कार्य अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता सारंग गोगटे, मुख्याधिकारी निखिल लांडगे, न. प. उपाध्यक्ष अजित मंगळागिरीवार, भाजपा तालुकाध्यक्ष हरीश ढवस, आशिष कावटवार, श्वेताताई वनकर, नंदाताई कोटरंगे, आकाशीताई गेडाम, शारदाताई गुरनूले, रोहिणीताई ढोले, दर्शन गोरंटीवार,महेश रणदिवे, लक्ष्मण कोडापे, गुरुदास पिपरे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

खुले नाट्यगृह केवळ कला-संस्कृतीपुरते मर्यादित न राहता बचत गट, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, सामाजिक संमेलने, विवाह व विविध कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. फिश मार्केट व खुले नाट्यगृहासाठी सोलार प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे विजेचा खर्च कमी होऊन सामान्य नागरिकांनाही या सुविधा कमी खर्चात सहज वापरता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्व. गजानन गोरंटीवार यांच्या आग्रहामुळे पोंभुर्णा ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा संकल्प साकार झाल्याची आठवण करून देत, पोंभुर्णा शहराच्या प्रगतीसाठी योगदान देता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. पोंभुर्णा नगरपंचायतची भव्य इमारत, विश्रामगृह, श्री राजराजेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती, माळी समाजासाठी सभागृह, आदिवासी वसतिगृह, वीर बाबूराव शेडमाके सभागृह, पत्रकार भवन, जिम, पंचायत समिती व तहसील कार्यालय इमारत अशा असंख्य विकासकामांमुळे पोंभुर्णाचा चेहरामोहरा बदलल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पोंभूर्णा येथील खुले नाट्यगृहातील नटराजाची भव्य मूर्ती स्थानिक कलाकारांना प्रेरणा देईल आणि येथील कलावंत एक दिवस मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर आपली कला सादर करतील, अशी ऊर्जा व दिशा मिळेल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
४१ कोटींची पाणीपुरवठा योजना
पोंभूर्णा शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्या लक्षात घेता, जुन्या पाईपलाईन व पाण्याच्या टाक्यांमुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचे नमूद करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील सव्वा वर्षात ४१ कोटी रुपये खर्च करून संपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची घोषणा केली.
रस्त्यासाठी मिळेल निधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीपासून जाणारा जुना व जीर्ण झालेला रस्ता नव्याने विकसित करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांकडे करणार आग्रही मागणी
धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की, प्रती हेक्टरी हेक्टरी २० हजार रुपये धानाचा बोनस शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री महोदयांशी लवकरच चर्चा करून आग्रही मागणी करणार आहे.
पोंभूर्णा नगरपंचायत २ कोटींचा निधी
पोंभुर्णा नगरपंचायतचे आर्थिक उत्पन्न कमी असून नगरपंचायतवर कोणताही आर्थिक भार पडू नये म्हणून स्वतंत्रपणे २ कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: